श्रीमंत छत्रपती -
संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
|
लहानपण :
संभाजीराजांचा
जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या
युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू
त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली.
संभाजीचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांच्या सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.
अनेक
ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे
त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच
कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी
संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची
धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे
गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा
थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून
दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन
पोहोचले.
तारुण्य आणि राजकारण्यांशी मतभेद :
इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत
संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या
विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले..
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन
झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज
स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.
सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील
अनुभवी मानकर्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा महाराजांचे अमात्य अण्णाजी
दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल
प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना
ते मान्य होणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब,
हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे
अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.
दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे
केवळ अण्णाजी दत्तोंच्या याच्या सागन्याव्रुनच केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना
शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या
अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना
पाठवावे लागले. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढ्य
शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले.
आपल्याला दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या
मनात कायम राहिला.
मोगल सरदार :
या
सगळ्या घडामोडींमुळे संभाजीराजे अत्यंत व्यथित झाले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचे
स्वराज्य सोडून औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाला सामील व्हायचा निर्णय घेतला.
त्यांना पुढे करून दिलेरखानाने स्वराज्यातील भूपाळगड या किल्ल्यावर हल्ला केला. किल्लेदार फिरंगोजी नरसाळाने किल्ला नेटाने लढवला पण शत्रुपक्षात
युवराज संभाजीराजे आहेत हे कळताच शरणागती पत्करली. संभाजीराजांनी गडावरील सैनिकांना
सुरक्षितपणे जाऊ द्यायची मागणी दिलेरखानाकडे केली. पण विजयोन्मादाने हर्षभरित झालेल्या
दिलेरखानाने ७०० मराठी सैनिकांचा प्रत्येकी एक हात तोडायचा आदेश दिला. संभाजीराजांना
त्याचा भयंकर संताप आला. त्यानंतर दिलेरखानाच्या सैन्याने अथणीवर हल्ला करून तेथील
जनतेवर अनन्वित अत्याचार केले. संभाजीराजांनी दिलेरखानाकडे या अत्याचारांचा जाब विचारला.
पण दिलेरखानाने त्यांना जुमानले नाही. संभाजीराजांना त्यांची चूक कळली आणि ते विजापूरमार्गे
स्वराज्यातील पन्हाळगडावर येऊन दाखल झाले. ते स्वराज्यापासून सुमारे एक वर्ष
दूर होते.
छत्रपती :
१६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तोनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.
प्रधान मंडळ :
सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले)
श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)
- सरसेनापती - हंबीरराव मोहिते
- कुलमुखत्यार (सर्वोच्च प्रधान) - कवी कलश (कलुषा)
- पेशवे - निळो मोरेश्वर पिंगळे
- मुख्य न्यायाधीश - प्रल्हाद निराजी
- दानाध्यक्ष - मोरेश्वर पंडितराव
- चिटणीस - बाळाजी आवजी
- सुरनीस - आबाजी सोनदेव
- डबीर - जनार्दनपंत
- मुजुमदार - अण्णाजी दत्तो
- वाकेनवीस - दत्ताजीपंत
औरंगजेबाची दख्खन मोहीम :
औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. ते सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे संभाजीच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
इ.स. १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितूर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-- गणोजी शिर्के काही गावांच्या वतनांसाठी शत्रूला सामील झाले.
दगाफटका :
इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.
शारीरिक छळ व मृत्यू :
त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.
बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडक्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदूषकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानुसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेवून त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.
.
पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.
संभाजी महाराजाना पुढील शिक्षा होती जबान काटायची. औरंगजेबाची तशी आज्ञा होती. दोन हबशी पुढे सरसावले, पण संभाजी राजांचा जबडा काही उखडेना. शेवटी हबशींनी नाक दाबले तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले तोच त्यांच्या तोंडात पक्कड घुसवली गेली. त्या पकडीत पकडलेली त्यंची जीभ तलवारीने कापली..
ही हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे करण्यात आली.
No comments:
Post a Comment